Monday, 22 April 2019

अंधार फार झाला
थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला
पणती जपून ठेवा  अंधार फार झाला

आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला

काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला

हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला

वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला

हे  वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला

शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला


बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती
कलिका जपून ठेवा अंधार फार झाला

ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा अंधार फार झाला

             दिनांक 23-एप्रिल जागतिक पुस्तक दिन, पुस्तकांबद्दल काही. open video please click   here https://drive.google.com/file/d/1IplX4qZ...